नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात मंगळवारी रणरणत्या उन्हात चक्कर येवून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. त्यात विवाह सोहळय़ानिमित्त शहरात आलेल्या श्रीरामपूर येथील ३७ वर्षीय विवाहीतेचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही ४० पार उष्णतेचा पारा वाढत असल्याने लाहीलाहीचा प्रत्यय येत आहे. सुनिता नितीन कारवाळ (३७ रा.सम्राटनगर,श्रीरामपूर) या नातेवाईकांच्या विवाह सोहळ््यानिमित्त कुटूबियांसह मंगळवारी शहरात आल्या होत्या. छत्रपती संभाजी मार्गावरील नांदूरनाका भागातील एमपायर गार्डन येथे विवाह आटोपून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कारवाळ दांम्पत्य परतीच्या प्रवासासाठी निघाले असता ही घटना घडली. लॉन्सच्या प्रवेशद्वारावर अचानक चक्कर येवून सुनिता कारवाळ कोसळल्या. पती नितीन कारवाळ यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता अल्पावधीतच उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात घडली. हिरावाडीतील अनिलकुमार मनोहरराव ठक्कर (५५ रा.सिध्देश्वरनगर) हे मंगळवारी सकाळी कामानिमित्त दिंडोरीरोड वरील मार्केट यार्ड भागात गेले होते. दहाच्या सुमारास मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराजवळून ते पायी जात असतांना अचानक चक्कर येवून जमिनीवर कोसळले. मुलगा अनिकेत ठक्कर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.