इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंफाळः मणिपूरमध्ये कुकी-झोमी समाजाच्या दोन महिलांची नग्न परेड केल्याप्रकरणी ‘सीबीआय’ने हुइरेम हेरोदास मेती आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
‘सीबीआय’ने किशोरच्या विरोधातही अहवाल दाखल केला आहे. राज्य पोलिसांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये हेरोदासला अटक केली होती. ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. पोलिसांनी महिलांना जमावाच्या ताब्यात दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ‘सीबीआय’च्या आरोपपत्रानुसार, राज्यात जातीय हिंसाचाराच्या वेळी दोन्ही महिलांनी पोलिसांच्या वाहनात आश्रय घेतला होता. त्यांच्यासोबत कारमध्ये एक तरुणही होता. वाहन सुरक्षित स्थळी न्या, असे महिलांनी सांगितले होते. त्यावर पोलिसांनी गाडीची चावी नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना गाडीत बसवून जमावासमोर नेले. जमावाने काही वेळातच दोघींना बेदम मारहाण केली.
आरोपपत्रानुसार जमावाने दोन्ही महिलांचे कपडे फाडले आणि त्यांची नग्न धिंड काढली. यानंतर सामूहिक बलात्कार झाला. एवढेच नाही, तर याच कुटुंबातील तिसऱ्या महिलेलाही या जमावाने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तिलाही अशाच पद्धतीने विवस्त्र करायचे होते; मात्र तिने नातवाला घट्ट पकडले. या वेळी जमाव नग्नावस्थेत महिलांकडे सरकला असता तिला पळून जाण्याची संधी मिळाली. पोलिसांच्या गाडीत महिलांसोबत बसलेल्या व्यक्तीच्या वडिलांची जमावाने आधी हत्या केली. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. दोघांचेही मृतदेह कोरडवाहू जमिनीत फेकून दिले. तरुणाची हत्या केल्यानंतर महिलांना कारमधून खेचून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करण्यात आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपपत्राबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की ज्या महिलांवर हल्ला करण्यात आला, त्यापैकी एक महिला कारगिल युद्धात सहभागी असलेल्या सैनिकाची पत्नी आहे. गेल्या वर्षी चार मे रोजी मणिपूरमध्ये जमावाने ही घटना घडवली होती; मात्र जुलैमध्ये दोन महिन्यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. या प्रकरणी ‘सीबीआय’ने गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी सहा आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.