नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्दळीच्या भागात धारदार तलवार घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली असून ही कारवाई देवळालीगावातील सिध्दार्थनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम गोविंद कसबे (रा.सिध्दार्थनगर झोपडपट्टी,मालधक्का देवळालीगाव) असे संशयित तलवारधारीचे नाव आहे. सोमवारी (दि.२९) सिध्दार्थनगर झोपडपट्टी भागात एक तरूण तलवार घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार धाव घेत पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्याकडे तलवार आढळून आले. याबाबत अंमलदार सागर आडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
बळजबरीने मोबाईल हिसकावला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या युवकाची वाट अडवित रिक्षातून आलेल्या भामट्यांनी दमदाटी करीत बळजबरीने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताराम बाळू कडू (रा. कारगिल चौक, दत्तनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कडू गेल्या रविवारी (दि.२८) रात्री कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. सतीष कंपनी परिसरातून तो रस्त्याने पायी जात असतांना रिक्षातून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत दमदाटी केली. यावेळी टोळक्याने त्याच्या खिशातील सुमारे पाच हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.