मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस समारंभ १ मे रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये, तहसील मुख्यालये तसेच इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एकाचवेळी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात येईल, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबईत शिवाजी पार्क, दादर येथे होणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. अन्य जिल्ह्यांच्या मुख्य कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री अथवा मंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण करणारे मंत्री अथवा लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिन समारंभास निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ च्या पूर्वी अथवा सकाळी ९ च्या नंतर आयोजित करण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या २ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये महत्त्वाचे दिवस साजरे करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहितेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.