नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावल्याने बांधकाम साईटवरील वॉचमनने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिनाभराच्या चौकशीअंती बजाज फायानान्सच्या वसूली अधिका-यासह कर्मचा-यां विरोधात अखेर अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड औद्योगीक वसाहतीतील म्हाडा कॉलनीत राहणा-या श्रावण दसरूजी गुरनुले (५०) यांनी २६ मार्च रोजी डीजीपीनगर येथील गुलमोहर कॉलनीत असलेल्या सुवास्तू अपार्टमेंटमधील वॉचमन रूममध्ये पंख्याच्या हुकास कापड बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेस महिना उलटल्यानंतर मृत गुरनुले यांच्या पत्नी निता गुरनुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
बजाज फायनान्स कंपनीचे वसूली अधिकारी प्रशांत बोरसे व अन्य कर्मचा-यांनी धमकावल्याने गुरनुले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. मार्च महिन्यात कर्जाचा हप्ता भरला न गेल्याने संशयितांकडून तगादा सुरू होता. वारंवार फोनवरून शिवीगाळ व दमदाटी करीत संशयितानी मानसिक छळ केल्याने गुरनुले यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.