पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने कोथरूड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर टाकलेल्या छाप्यात ढाबाचालक ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आला. या प्रकरणात ढाबाचालकासह चार मद्यपींना अटक करुन एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने ढाबाचालकाला १ लाख रूपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
राज्य उत्पादन शुल्क ‘सी’ विभागाच्या पथकाने शनिवार (ता.२७) रोजी कोथरूड येथील हॉटेल खिंड या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असताना आढळून आल्याने त्याचेसह चार मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. १ शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम यांनी कळविले आहे.