नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात, यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात. जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात अभियंते, जनमित्र व बाह्यस्त्रोत कामगारांच्या माध्यमातून ही कामे सुरू झाली असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो त्यासाठी कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण चे कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास सदर कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतोच, त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ वीज पुरवठा बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहीत्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आणि संबंधित ठिकाणी आढळणाऱ्या त्रुटी दूर करून अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो.
महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडीत पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना या प्रादुर्भावामध्ये घरबसल्या योग्य सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद करून ही कामे केली जातात. ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून तसेच तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते त्यामुळे त्यानंतरसुद्धा महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. त्यामुळे घरी असलेले सर्वच नागरिक, वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.









