नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंपनीत काम करणा-या तरूणीने आपल्या मालकास साडे पाच लाखाला गंडा घातला आहे. व्यवसाय थाटण्यासाठी घेतलेली रक्कम न देता युवतीने थेट खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने मालकाने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक्षा अनिल मोरे (रा.पाथरशेंबे ता.चांदवड) असे ठकबाज युवतीचे नाव आहे. याबाबत निलेश अर्जुन दळवी (रा.ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. दळवी यांची कंपनी असून या कंपनीत सदर तरूणी नोकरीस होती. तक्रारदार व संशयित एकमेकांचे नातेवाईक असल्याने कंपनीचे बहुतांश काम युवती सांभाळत होती. संशयित तरूणीने २०२२ मध्ये व्यवसाय वृध्दीसाठी स्व:ताची कंपनी स्थापन करण्याची तयारी दर्शविल्याने ही फसवणुक झाली.
दळवी यांनी नातेवाईक आणि विश्वासू असल्याने मदतीचा हात देत तिला ५ लाख ४३ हजार रूपये हातउसनवार दिले. सदरची रक्कम वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात देण्यात आली. मात्र दीड वर्ष उलटूनही तरूणीने पैश्यांची परतफेड न केल्याने दळवी यांनी तिच्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला असता युवतीने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.