नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व डॅा. भारती पवार यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंद दाराआड चर्चा केली. तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये तडकाफडकी दाखल झाले असून त्यांनी एका हॅाटेलमध्ये पदाधिका-यांसोबत गुप्त बैठक घेतली.
काल महाविकास आघाडीने आपले शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता महायुतीमध्ये मोठ्या हालचाली नाशिकमध्ये सुरु झाल्या आहे. त्यात भुजबळांनी अद्याप प्रचारात सहभाग न घेतल्यामुळे डॅा. भारती पवार यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे २ मे रोजी महायुतीचे उमेदवारी अर्ज दाखल करणे व पिंपळगाव येथे आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन करण्याचे कामही या भेटीत असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या की, भुजबळ ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांची याआधी देखील त्यांची भेट घेतली. विकासाच्या कामांसाठी त्यांनी नेहमीच दिशा आणि मार्गदर्शन केले आहे. २ मेला आम्ही अर्ज दाखल करतोय. या भेटीत
भुजबळांनी लोकांना भेटा, कांदा प्रश्नांवर लोकांना आपण काय केलंय ते सांगा असे सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानतंर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार
२ तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहोत. तोपर्यंत नाशिकच्या जागेचा उमेदवार देखील कदाचित १-२ दिवसांत जाहीर होईल
आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. त्याचप्रमाणे मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मोदी यांनी पवारांवर केलेल्या टीकेबद्दल ते म्हणाले की, पवार मोदींवर टीका करतायत तर मोदी देखील त्यांच्यावर टीका करणारच असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नाशिकच्या उमेदवारीबाबत बोलतांना सांगितले की, आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार, कधी कधी चांगल्यातून चांगलं निवडणे कठीण जातं, मात्र आमचे उमेदवार निवडून येणार असेही त्यांनी सांगितले.