नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थितीत होते. यावेळी ते म्हणाले की, लोकांची गर्दी पाहून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार भास्करराव भगरे यांचा विजय निश्चित असल्याची जाणीव झाली.
ते पुढे म्हणाले की, नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच महाविकास आघाडीच्या मागे मतदार खंबीर उभा आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, तिथे मी जाऊन आलो. या सर्व भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण आहे.
काल परवा महाराष्ट्रातील कांदा पडून असताना फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्याचे पाप सरकारने केले. त्यांना महाराष्ट्राचा कांदा दिसला नाही. विरोधात वातावरण जातंय पाहून देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयापाठोपाठ ट्विट केले. मोदी साहेबांचे आभार मानले आणि सांगितले की, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यातबंदीही उठवली. हे सत्य नाही. मागचाच निर्णय पुन्हा घोषित केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग थांबवायचा असेल तर निवडणुकीत मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हा समोरचे बटन दाबून आपली माणसं दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी घ्या.