नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अरबी समुद्रात १७३ किलो अमली पदार्थ घेऊन जाणारी मासेमारी नौका पकडली आणि त्यावरील दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
एटीएस गुजरातने पुरवलेल्या विश्वासार्ह आणि गुप्तचर माहितीच्या आधारावर, संशयित नौकेवर पाळत ठेवून भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली. नौका ताब्यात घेतल्यावर केलेल्या तपासामधून गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती अचूक असल्याचे, तसेच ही नौका आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचा अमली पदार्थांच्या तस्कारीमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी नौकेवरील व्यक्तींची चौकशी सुरु आहे.
भारतीय तटरक्षक दलाने गेल्या तीन वर्षात राबवलेली अशा प्रकारची ही बारावी जप्ती मोहीम आहे. नुकतीच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ वाहून नेणारी एक पाकिस्तानी मासेमारी नौका ताब्यात घेण्यात आली, या कारवाईचाही यात समावेश आहे. यामधून या दोन्ही संस्थांची देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची आणि समुद्रातील बेकायदेशीर कारवायांचा बीमोड करण्याची वचनबद्धता अधोरेखित होते.