इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललित पाटील व त्याचा भाऊ भूषण पाटील नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्ज कारखान्यातून नेमकी किती कमाई करत होता हे आता समोर आले आहे. या काऱखान्यात ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. ते मुंबई नाशिक, नवी मुंबई व ठाणे येथे पाठवले जात. यातून पाटील याला निव्वळ नफा ५० लाख रुपये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२१ पासून येथे या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवले जात होते. ललित पाटील प्रकरणात असे अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे.
याप्रकरणात काल रात्री त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गजाआड केले आहे. सचिन वाघ (३०) असे या चालकाचे नाव आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यापासून हा चालक ललित पाटील बरोबर होता. त्यानेच वेगवेगळ्या ठिकाणी ललित पाटील याला वाहनातून नेल्याचेही समोर आले आहे. तर गुरुवारी नाशिकहून ललित पाटील याला मदत करणा-या दोन महिला प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली. त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी असल्याची माहिती समोर आली असून ड्रग्ज रॅकेट चालवण्याचे प्लॅनिंग ती करत होती. या दोघांचे खासगी फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात ललित पाटील मॉलमध्ये, सिगारेट पितांना तर कधी प्रज्ञाबरोबर तो दिसत आहे. ललित पाटील जवळ असलेल्या दोन आयफोनच्या माध्यमातून ललित पाटील आपल्या साथीदारांशी आणि प्रज्ञा कांबळेशी संपर्कात होता.
७ ऑक्टोबरला ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. त्यात नाशिकमध्ये ३०० कोटीचे त्याच्या काराखन्यातून ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या भावासह एकाला अटक केली. दुसरीकडे नाशिक पोलिसांनी छापा टाकत ५ कोटीचे ड्रग्ज जप्त केले. मुंबई, नाशिक, पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे एकुणच ललित पाटील याचे रॅकेट संपूर्ण उघड होत असून अजून त्यात ब-याच गोष्टी समोर येणार आहे. त्यात आता ही ५० लाखाची माहिती समोर आली आहे.