नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहत भागात जुन्या वादातून टोळक्याने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार चॉपरचा वापर करण्यात आल्याने दोघे मित्र गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन आहिर व त्याचे दोन साथीदार अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत विजय विठ्ठल शिंदे (२८ रा.गुलमोहर कॉलनी,ध्रुवनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. विजय शिंदे व राम मनोहर पाटील हे दोघे मित्र शनिवारी (दि.२७) सायंकाळाची अशोकनगर भागात गेले असता ही घटना घडली.
राज्य कर्मचारी वसाहत भागातील खंडेराव मंदिर परिसरात दोघा मित्रांना संशयित त्रिकुटाने गाठले. यावेळी जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी त्यांच्यावर धारदार चॉपरने वार केले. या घटनेत दोघे मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.