नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचवटी भागात वेगवेगळया ठिकाणी तीन चोरीच्या घटना समोर आल्या आहे. या चोरीमध्ये तीन महिलांचे सुमारे अडिच लाखाचे अलंकार चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोदाघाटासह पर्यटक शहरातील विविध मंदिरासह ठिकठिकाणी भेटी देत असतांना चोरटे हात साफ करत आहे. पहिली घटना सांडवा देवी मंदिर भागात घडली. इंदिरानगर भागातील कांचन मनोज कदम (रा.पार्क साईड, वडाळा पाथर्डीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कदम शनिवारी (दि.२७) रात्री गोदाघाटावर गेल्या होत्या. सांडवा देवीचे दर्शनासाठी त्या रांगेत उभ्या असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्याच्या पर्सला ब्लेड मारून पर्स मधील सोन्याचे दागिणे,मोबाईल,रोख रक्कम व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे १ लाख ३३ हजाराचा ऐवज चोरून नेला. तिनही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेवाळे,सोर व पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
दुस-या घटनेत कर्नाटक राज्यातील सुजाता लक्ष्मी (७० रा.कोरटा गेरे जि.तुमकूर) या वृध्दा रविवारी (दि.२८) आपल्या कुटूंबियासह देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या सितागुंफा मंदिरासमोरील भक्तांच्या रांगेत दर्शनासाठी उभ्या असतांना चोरी झाली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे एक लाखाची सोनसाखळी हातोहात लांबविली.
तिसरी घटना गोदाघाटावरील रामकुंड भागात घडली. छत्रपती संभाजीनगर येथील शितल मुकेश वाघचौरे (रा.टिव्ही सेंटर,स्वामी विवेकानंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघचौरे या रविवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास गोदाघाटावरील मंदिरामध्ये देवदर्शन घेत असतांना ही घटना घडली. रामकुंड भागातून दर्शन घेवून त्या कपालेश्वर मंदिराच्या दिशने जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील पर्सला ब्लेड मारून चोरट्यांनी सोन्याची पोत,मोबाईल,रोकड आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.