इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळूरः धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे आमदार चिरंजीव एच. डी. रेवण्णा (६७) आणि खासदार नातू प्रज्वल रेवण्णा (३३) यांच्याविरुद्ध त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात राजकीय भूकंप आला आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, तसेच माझ्या मुलीशी व्हिडिओे कॅाल करुन घाणेरड्या भाषेत बोलत होता असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी यांनी हे राज्यातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘पेन ड्राइव्ह’मध्ये लैंगिक शोषणाशी संबंधित शेकडो पीडितांचे व्हिडिओ आहेत. यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या आणि इतर महिलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला आयोगाच्या शिफारशीवरून सहायक पोलिस महानिरीक्षक बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. नागलक्ष्मी यांनी सांगितले, की गेल्या आठवड्यापासून हसन जिल्ह्यात मोठ्या संख्येने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. महिलांसाठी काम करणाऱ्या कर्नाटक राज्य महिला दुर्जनय विरोधी ओकुट्टासह तीन संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. व्हायरल झालेले व्हिडिओ अत्यंत हिंसक आणि आक्षेपार्ह आहेत. या व्हिडिओमध्ये महिला आपली सुटका करण्याची विनंती करत आहेत. खासदार प्रज्वल स्वत: व्हिडिओ शूट करत आहेत. हे व्हिडिओ इतके आक्षेपार्ह आहेत, की मी ते पाहू शकले नाही.
२६ एप्रिलला हसन लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर प्रज्वल परदेशात गेले. दरम्यान, प्रज्वलचे काका व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आम्ही चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करू. कुणी गुन्हा केला असेल, तर त्याला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.