इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महाविकास आघाडीतर्फे नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर, दिंडोरीतून भास्कर भगरे हे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. शालिमार येथील शिवसेना (ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचार फेरी काढून हे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करत असतांना नाशिकच्या जागेच्या तिढ्यामुळे महायुतीचे उमेदवारी अर्ज उशीरा भरले जाणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी डॅा. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली असली तरी नाशिकमध्ये उमेदवार जाहीर न झाल्यामुळे ही तारीख लांबणार आहे.