मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मुंबई पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करुन बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह सात आरोपींना गजाआड करण्या आले आहे. या टोळीमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात होते. या टोळीने १४ बालकांची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शीतल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय खंदारे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये ११ मुले, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त नऊ महिने असे विक्री केलेल्या बाळांचे वय आहे.
पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्टिलिटी फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात होते. दोन बाळांची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटकेतील आरोपी मुंबईमधील काही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही हॉस्पिटलही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. डॉ. खंदारे याचा दिवा येथे दवाखाना आहे. मूळच्या नांदेडचा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी होता. विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करून रत्नागिरीमध्ये देण्यात आले होतं. तेलंगणामधून या बाळासाठी मागणी होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता.