नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात पोलीसांनी जुगारींवर कारवाईचा बडगा उगारला असून, शुक्रवारी (दि.२६) वेगवेगळया भागात छापेमारी करीत उघड्यावर जुगार खेळणाºया सात जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत सुमारे तीन हजाराच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील दत्तचौकात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पथकाने धाव घेत छापा टाकला असता दिपक पांडूरंग कांबळी,संदिप दामा वळवी व नाना विष्णू शिल्लक हे तिघे दत्तचौक येथील मटन मार्केट भागातील नाल्या जवळ टाईम नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार ३८० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत युनिटचे हवालदार वाल्मिक चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई सावतानगर येथील बजरंग चौकात करण्यात आली. व्यायाम शाळेच्या पाठीमागील बोळीत अशोक जगन चोथे व लक्ष्मण काळू शिरसाठ हे दोघे स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ७९० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार अनिल गाढवे यांनी फिर्याद दिली आहे. दोघी कारवाई प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार नितीन राऊत करीत आहेत.
तिसरी कारवाई गंगाघाटावर करण्यात आली. रामसेतू पुलाजवळील पांडे मिठाई भागात संतोष किसन जाधव व गोकुळ रामचंद्र काकड हे दोघे कल्याण ओपन क्लोज नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ९०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार कुणाल पचलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.