इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चीनने बांधलेल्या विमानतळाचे व्यवस्थापन भारताच्या एका कंपनीकडे आले आहे. हा निर्णय चीनसाठी धक्का मानला जात आहे. श्रीलंकेतील हंबनटोटा येथे असलेल्या मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भारत आणि रशियाच्या कंपनीकडे देण्यात आली आहे. हे विमानतळ २०९ दशलक्ष डॉलर खर्चून बांधण्यात आले आहे. एकेकाळी फ्लाइटच्या कमतरतेमुळे हे विमानतळ नेहमी चर्चेत होते.
या व्यवस्थापनाबाबत सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री बंडुला गुणवर्देना यांनीच ही माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने ९ जानेवारी रोजी संभाव्य पक्षांकडून स्वारस्य व्यक्त करण्यास आमंत्रित करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर पाच प्रस्ताव प्राप्त झाले. मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या सल्लागार समितीने भारताच्या शौर्य एरोनॉटिक्स (प्रा.) लिमिटेड आणि रशियाच्या एअरपोर्ट्स ऑफ रीजन मॅनेजमेंट कंपनीला ३० वर्षांसाठी व्यवस्थापन करार देण्याचा निर्णय घेतला.
गुणवर्देना म्हणाले, की नागरी विमान वाहतूक आणि विमानतळ सेवा मंत्री यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी चीनने जादा व्याजदराने व्यावसायिक कर्ज दिले. या प्रकल्पासाठी २०९ दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आले. त्यापैकी १९० दशलक्ष डॉलर चीनच्या एक्झिम बँकेने उच्च व्याजदराने प्रदान केले. श्रीलंका सरकार २०१६ पासून या विमानतळाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यावसायिक भागीदार शोधत आहे कारण त्याचे मोठे नुकसान होत आहे.
हे विमानतळ बांधून चीनने श्रीलंकेला आणखी एका कर्जाच्या सापळ्यात अडकवले, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता भारतीय आणि रशियन कंपन्यांना व्यवस्थापनाची जबाबदारी मिळाल्यानंतर काय बदल होतील हे पाहावे लागेल.