नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड व संभाजीरोडवर घरगुती गॅसमधून बेकायदा वापर करणारे दोन अड्डे पोलिसांनी उदध्वस्त केले. या छाप्यात अॅटोरिक्षासह सुमारे १ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यात रोकडसह भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या, इलेक्ट्रीक मोटारी आणि वजन काटे या ऐवजाचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ व आडगाव पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायद्यान्वेय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला छापा संभाजीनगर रोडवरील निलगीरी बाग भागात टाकण्यात आला. कैलासनगर येथे बेकायदा गॅस अड्डा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार आडगाव पोलीसांनी छापा टाकला असता या ठिकाणी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रीक मोटार,घरगुती वापरातील अर्धवट भरलेल्या गॅस टाक्या,नोझलसह रेग्युलेटर, स्टीलचा वजन काटा असा सुमारे ३३ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी हवालदार निलेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात किरण किशोर ठोंबरे (रा.कैलासनगर,निलगिरीबाग) या अड्डा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दाईगडे करीत आहेत.
दुस-या घटनेत पेठरोडवरील अश्वमेधनगर भागात वाहनांना घरगुती गॅसमधून बेकायदा गॅस भरून दिला जात असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलीसांनी शिवमुद्रा किराणा दुकानाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता या ठिकाणी इलेक्ट्रीक मोटारीच्या माध्यमातून घरगुती गॅस अॅटोरिक्षात भरला जात होता. पथकाने विक्की नरसिंग ठाकुर व ओमकार भगवान परमार (रा. दोघे साईराम किराणा दुकानाजवळ,अश्वमेधनगर पेठरोड) या दोघा संशयितांना ताब्यात घेत या ठिकाणाहून अॅटोरिक्षा, इलेक्ट्रीक मोटार व वजन काटा तसेच भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या असा सुमारे १ लाख २९ हजार १८० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पंकज महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.