इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने पुन्हा दणका दिला आहे. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हाच्या प्रचार गीतात धार्मिक शब्द वापरल्याबद्दल दिलेल्या आदेशाचा फेरविचार करण्याबाबत दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. ठाकरे गटाला आता याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे.
ठाकरे गटाने याअगोदरच गीतातील हे शब्द वगळण्यास नकार देऊन ‘जय भवानी’ हा शब्द काढणार नाही, असे म्हटले आहे. हुकुमशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाने नोटीसाला उत्तर देत फेरविचार करण्याचा अर्जही दिला. पण, तो आता फेटाळण्यात आल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार आहे. मुख्य निवडणूक आयोगाने जर दिलासा दिला नाही. तर त्यानंतर ठाकरे गट काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे आहे.
हा आहे आक्षेप
२४ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द, मजूकर वापरल्याबद्दल व इतर कारणांसाठी विविध पक्षांना ३९ नोटिसा पाठवल्या आहेत. यात ठाकरे गटाचाही समावेश होता. यातील १५ नोटिसांना उत्तर आले आहे. वास्तविक नोटीसमध्ये ‘जय भवानी’ शब्दाचा उल्लेख नाही; मात्र प्रचार गीतात धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये, असे नमूद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने प्रचार गीतातील ‘जय भवानी’ या शब्दाला आक्षेप घेतल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते.
ही आहे मागणी
आमच्यावर कारवाई करण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देवाच्या नावाने मत मागतात ते चालते का? असा सवाल करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केली होती.