इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पवार विरुध्द पवार सामना चांगलाच रंगला. त्यात आता बारामतीत थेट शरद पवार व अजित पवार आमने सामने आल्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. एकमेकांचा पराभव करण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन्ही गट सरसावले आहे. त्यात आता बारामतीत शरद पवार गटाचे बुथच लागू द्यायचे नाही असे नियोजन करण्यात आल्याची चर्चा असून त्यावर आ. रोहित पवार यांनी जोरदार हल्ला केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, बारामतीची निवडणूक स्वाभिमानी सामान्य लोकांनी हातात घेतल्याने बळकावलेल्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे बुथही बारामती मतदारसंघात लागले नाही पाहिजेत, असे निरोप घाबरलेल्या अजितदादांच्या पक्षाकडून मलिदा गँगसह दुष्प्रवृत्तीच्या लोकांमार्फत देण्यात येत आहे.
पण या मलिदा गँगला एकच सांगतो, ‘‘सत्तेच्या बळावर तुम्ही देत असलेल्या धमकीला निष्ठावंत आणि स्वाभिमानी सामान्य लोक भीक घालणार नाहीच पण उद्या आमच्या हाती सत्ता येणार आणि तेंव्हा गाठ आमच्याशी असेल! त्यामुळं नीट विचार करा. असे पोस्टमध्ये म्हटले आहे.