इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रवाशाला तिकिटाच्या रकमेची मागणी केल्यामुळे प्रवाशाने वाहकावर थेट चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. हा चाकु हल्ल्या करणा-याला अटक करण्यात आली आहे.
फिरोज शेख असे हल्ला करणा-याचे नाव आहे. त्याने वाहक योगेश काळे यांच्यावर हल्ला केला. ही बस संभाजीनगर आगाराची होती. ती नागपूर येथून संभाजीनगरसाठी निघालेली असतांना फिरोज शेखकडे वाहक योगेश काळे यांनी तिकीटाची रक्कम मागितली. पण, त्याने ऑनलाइन तिकीट काढल्याची माहिती दिली. वाहकाने मोबाईलवर आलेला मेसेज दाखवण्यास सांगितले. त्यावरुन, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शेख याने काळे यांच्याशी वाद घातला आणि नंतर वाहकावर चाकू हल्ला केला. त्यात वाहक काळे गंभीर जखमी झाले. त्यावेळेस काही प्रवाशांनी हिंमत दाखवत फिरोजला पकडले. दुसऱ्या एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली
दरम्यान फिरोजने त्याचा मोबाईल फोन आणि चाकू चालत्या बसमधून फेकून दिला. या वेळी बसचालक संतोष मच्छींद्र जाधव यांनी बस कोंढाळी पोलिस ठाण्यात आणली. पोलिसांनी काळे यांना उपचारासाठी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. शेख याला अटक करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.