इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरु झालेला असतांना महायुतीमध्ये सात जागांवरील तिढा अजून सुटलेला नाही. पण, आज नाशिक लोकसभा मतदार संघासह ठाणे येथील मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा होण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार असून त्यात नाशिकहून हेमंत गोडसे तर ठाणे येथून आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
गेला महिनाभर या दोन्ही जागांवरुन शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यामुळे हा तिढा सुटत नव्हता. पण, आता जवळपास हा तिढा सुटला असून शिवसेनेच्याच वाट्याला या दोन्ही जागा जाणार आहे.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर नाशिकमध्ये विद्यमान खासदार आहे. त्यामुळे या दोन्ही जागावर शिंदे गट ठाम असून त्यामुळे या जागा त्यांच्याच पारड्यात पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावे चर्चेत आलेली असली तरी खासदार गोडसे हेच उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. गोडसे यांनी जवळपास प्रचाराची एक फेरी सुध्दा पूर्ण केली असून त्यांनी कालच उमेदवारी अर्ज सुध्दा आणला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे..