नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करुन त्यांची उमेदवारी बदलावी यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी गंभीर आरोप करत राजीनामा दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. अगोदरच दिंडोरी मतदार संघात कांदा उत्पादक, रेल्वे चाकरमाने यासह अनेक जण डॅा. भारती पवार यांच्यावर नाराज असतांना हा राजीनामा भाजपला मोठा धक्का आहे.
डॅा. पवार यांनी माझी तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे करा, माझी उमेदवारी रद्द करा, प्रचारात येवू नका, तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायची का? असे फोनवर सांगत नाराजी दूर करण्याएेवजी अरेरावी केल्याने व्यथित होऊन राजीनामा देत असल्याचे बर्डे यांनी सांगितले.
बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्याकडे दिला आहे. दिंडोरी लोकसभेत एकीकडे मतदारांची नाराजी असतांना आता पक्षातंर्गत असलेली नाराजी समोर आली आहे.