इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतिगिरी महाराजांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे बाबाजी भक्तगण परिवाराने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्या य़ा उमेदवारीमुळे महाविकास आघाडी की महायुती यातील कोणाला फटका बसतो हे महत्त्वाचे असणार आहे.
शांतिगिरी महाराज यांनी अगोदर राजकीय पक्षांकडून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शांतिगिरी महाराजांनी २००९ मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १ लाख ४८ हजारं मते मिळाली होती. पण, या पराभवानंतर ते राजकारणापासून लांब राहिले. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा नाशिकमध्ये लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतिगिरी महाराजाचे मुळ गाव आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला.
शांतिगिरी महाराजांचे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. वेरुळे येथील जनार्धन स्वामी मठाचे ते मठाधिपती आहे. या मठाची कोट्यवधींची संपत्ती आहे. देशात ५५ हून अधिक मठ आहे. त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यामुळे धर्मनगरी असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे राजकारणात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.