इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पणजीः कडक उपवासामुळे दोन भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा घटनेत गोव्यात एकाच घरात दोन भावांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. २९ आणि २७ असे वय असलेल्या या दोन्ही भावांचा मृत्यू उपासाने झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना घरात त्यांची आई बेशुद्धावस्थेत आढळली होती.
मोहम्मद झुबेर खान (२९) आणि अफान खान (२७) अशी या भावांची नावे आहेत. मोहम्मद झुबेर खान हा अभियंता होता. त्यांची आई रुक्साना खान यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी त्यांना मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था महाविद्यालयात पाठवण्यात येणार आहे.
हे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाला फक्त एक खजूर खात होते. मुलांचे वडील गारमेंट सेल्समन असून उपवासाववरून त्यांच्यात मतभेद असल्याने ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी दोन्ही भावांच्या मृत्यूचे संभाव्य कारण म्हणून ‘गंभीर कॅशेक्सिया आणि कुपोषण’ असल्याचे म्हटले आहे.