इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुंबईत जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. हसन शेख (१६) असे स्वयंसेवकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुंबईत दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यावेळेस ही वीज कोसळली. जुहू चौपाटीवर मोठी गर्दी होत असल्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणांकडून गणेश भक्तांच्या गर्दीचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या मदतीसाठी येथे स्वयंसेवकदेखील उपस्थित आहेत.
त्यातील हसन शेख या स्वयंसेवकाला आपले प्राण वीज कोसळल्यामुळे गमवावे लागले. मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरून ही धक्कादायक घटना घडली.