नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीक जलपरी चोरी करणा-या दुकलीस पोलीसांनी जेरबंद केले. या दुकलीच्या ताब्यातून तांब्याची केबल, पाच जेलपरी, एक इलेक्ट्रीक मोटार व केबल आणि पिस्टन असा सुमारे ६६ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास धर्मा दळवी (३४ मुळ रा. बेहेडमाळ पेठ हल्ली खामखेडा ता. सटाणा) व राजेंद्र जयराम गायकवाड (रा.शंकरनगर,तवलीफाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मधुकर मुरलीधर भोर (रा. नवीन जकातनाका पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विहीरीतील मोटारी चोरीची मालिका सुरू आहे. पोलीस चोरट्यांचा मागावर असतांना संशयितांना भोर यांच्या विहीरीतील जलपरी चोरी करणे महागात पडले आहे.
म्हसरूळ पोलीसांनी गुरूवारी (दि.२५) दोघांच्या मुसक्या आवळल्या असून गायकवाड याच्या घरझडतीत चोरीच्या पाच जलपरी, एक इलेक्ट्रीक मोटार, केबल व पिस्टन असा सुमारे ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या हाती लागला आहे. चोरीच्या मोटारी खोलून संशयित स्पेअरपार्ट विक्री करीत असल्याचे तपासात पुढे आले असून त्यांच्या अटकेने अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.