नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात पार्क केलेली स्विफ्टकार,अॅटोरिक्षासह चोरट्यांनी तीन दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी भद्रकाली म्हसरूळ,सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कैसर यासिन कोकणी (रा.यासिन मंजिल,राजमहेल हवेली,कोकणीपूरा) यांची सुमारे तीन लाख रूपये किमतीची स्विफ्ट कार (एमएच १५ एफएफ ८४१३) बुधवारी रात्री त्यांच्या घराशेजारील बोळीत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. तर चौक मंडई येथील अजिज बाबू शेख (रा.हबीबभाई सर्व्हीस स्टेशन,चौकमंडई ) यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एके ५५८४ बुधवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास तलावडी भागातील मराठा खानावळ परिसरात पार्क केलेली असतांना ती मेहबुब मोहम्मद शेख (रा. किस्मतबाग,कब्रस्तानजवळ) या संशयिताने चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील संशयित रिक्षाचोरास पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार व हवालदार बोंबले करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना आसाराम बापू पुल भागात घडली. याबाबत विशाल शैलेष घाडगे (रा.कार्बन नाका,शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. घाडगे गुरूवारी (दि.२५) आसाराम बापू मार्ग भागात गेले होते. पुलाजवळ लावलेली त्यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ जीसी २३९४ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत. दुसरी घटना त्र्यंबकरोडवरील चंद्र्रभागा लान्स परिसरात घडली. याबाबत हर्षद उखा महाजन (रा.श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
महाजन यांची पॅशन दुचाकी एमएच १५ इव्ही ९५०५ गेल्या रविवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत. तर पंढरीनाथ केरू पाटील (रा.जुना कारखानारोड,पळसे ता.जि.नाशिक) यांची शाईन एमएच १५ जीएम १८७३ रविवारी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.