नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघात मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्यांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्याच दिवशी हा उमेदवारी अर्ज दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी घेतला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. महायुतीसाठी शिंदे गटाला जागा सुटेल हे निश्चित असतांना याठिकाणी भाजप व राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे येथे अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यातच शिंदे गटातही उमेदवारीवरुन बरीच रस्सीखेच सुरु आहे.
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी आज किंवा उद्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर झाले केले असून हे दोघेही उमेदवार २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहे.