नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या वर्षाच्या यात्रेतील वगर्णीच्या हिशोबातून नाशिकरोड जवळ असलेल्या चाडेगाव येथे तरूणास बेदम मारहाण करुन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चुलत भावाने गोळी झाडल्याने ज्ञानेश्वर मानकर हा युवक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित सचिन मानकर याच्यासह नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन मानकर, नाना हुळहुले, महेंद्र मानकर, गोकुळ मानकर, सुरज वाघ, आकाश पवार, अमोल नागर, सतीश सांगळे व नंदू नागरे अशी गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत ज्ञानेश्वर प्रकाश मानकर हा युवक जखमी झाला आहे. चाडेगाव येथील ग्रामदैवत असलेल्या काशाबाई देवीची ४ मे रोजी यात्रा आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी संशयित सचिन मानकर याने नागरीकांची बैठक बोलावली होती. या बैठकीस तीस ते चाळीस ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत सचिन मानकर याने चुलत भाऊ ज्ञानेश्वर मानकर,अमोल मानकर,निलेश नागरे व शरद बोडके यांच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली गत वर्षाची वर्गणीची रक्कम १ मे पर्यंत जमा करण्याचे सांगितले. त्यानंतर कमी ग्रामस्थ असल्याने बैठक आटोपती घेण्यात आली.
शुक्रवारी (दि.२६) पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाल्याने अन्य नागरीक मार्गस्थ झाले. तर सचिन मानकर ज्ञानेश्वर मानकर, नाना हुळूहुले महेंद्र मानकर गोकुळ मानकर सुरज वाघ आकाश पवार अमोल नागरे सतीश सांगळे नंदू नागरे आदी तरूण दोन वाहनांमधून चाडेगाव फाटा येथील अमोल शिंदे यांच्या हॉटेलवर जेवण्यासाठी गेले. जेवण आटोपल्यानंतर संशयित सचिन मानकर याने आपला चुलत भाऊ ज्ञानेश्वर मानकर यांच्याशी वाद घातला. मागील यात्रेतील हिशोबाच्या रकमेत वीस हजार रूपये जास्त देण्यात आल्याचा दावा करीत त्याने ज्ञानेश्वरकडे वीस हजार रूपये आत्ताच्या आत्ता दे अशी मागणी लावून धरल्याने ही घटना घडली.
या वादातच संतप्त सचिन मानकर याने सिनेस्टाईल आपल्या कमरेची पिस्तूल काढून पैसे देतो की नाही, नाही तर गोळी झाडीन अशी धमकी देत थेट हवेत गोळीबार केला. ज्ञानेश्वर याने कशी बशी सुटका करून घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दिशेने संशयिताने दोन गोळय़ा झाडल्या. त्यापैकी एक गोळी कमरेला चाटून गेली तर दुसरी गोळी पाठीत घुसली त्यामुळे ज्ञानेश्वर मानकर जमिनीवर कोसळला. गोकुळ नागरे या मित्राने त्यास तात्काळ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असून शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृर्तीत सुधारणा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याबाबत जखमी ज्ञानेश्वरच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची दखल घेत उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देत जखमीची विचारपूर केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व उपनिरीक्षक बिडकर हे करत आहे.