इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या देशात ५० टक्के पशुवैद्यकांची कमतरता असून वर्ष २०३५ पर्यंत १ लाख २५ हजार एवढ्या पशुवैद्यकांची आवश्यकता असेल. राज्यात पशुवैद्यक विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करणे आवश्यक आहे. सध्या पदवी आणि पदव्युत्तर यामध्ये अनुक्रम ४०५ आणि २४० अशी प्रवेश क्षमता आहे. राज्याला सुमारे ६ हजार ६०० पशुवैद्यक पदवीधरांची गरज आहे. सध्या राज्य पशुसंवर्धन विभागाकडे २ हजार ५०० पशुधन विकास अधिकारी असून ३ कोटी ३३ लाख ७९ हजार ११८ पशुधनाची संख्या आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी येथील मौ. सावळी विहिर खुर्द येथे सुमारे ७५ एकर जमिनीवर हे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येईल. यासाठी एकूण २३४ पदे नियमित आणि शिक्षकेतर ४२ अशी बाह्यस्त्रोताने पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण १०७ कोटी १९ लाख इतका खर्च येईल. तसेच उपकरणे, यंत्रसामुग्री, इमारती इत्यादीसाठी ३४६ कोटी १३ लाख एवढा खर्च येईल.