पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून खून करण्याची सुपारी वडिलांनीच गुंडाना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी वडिलांसह सहाजणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे दोन वेळा मुलाला मारण्याचा प्रयत्न केला पण, तो त्यात बचावला.
अरगडे हाइट्स इमारतीजवळ १६ एप्रिल रोजी दुपारी बांधकाम व्यावसायिक धीरज यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तुल रोखले. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने धीरज बचावले आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न फसला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. धीरज अरगडे-पाटील आणि त्यांचे वडिल दिनशचंद्र यांच्या वाद असून मालमत्तेवरुनही त्यातून वडिलांनीच ही सुपारी दिली.
या घटनेत आरोपी असेलेले वडील दिनेशचंद्र यांनी धीरज यांना जीवे मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी दिली होती. बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर १० मार्च रोजी पहिला हल्ला झाला होता. मात्र तेव्हा ते बचावले होते. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्या वडिलांना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून २० लाख रुपये उकळले होते. मात्र, धीरज बचावल्याचे कळताच आरोपींचा हल्लेखोरांसोबत वाद झाला होता. दुसऱ्या प्रयत्नातही सुदैवाने धीरज हे बचावले.