इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः लोकशाहीत कोण काय करेल याचा नेम नाही. खरं तर लोकसभा निवडणुकीत एखादा उमेदवार हा एकाचवेळी जास्तीत जास्त दोन मतदारसंघातच उभा राहू शकतो, असा नियम आहे. पण, सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केलेले व्यंकटेश्वर महास्वामी यांनी चार लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या आता अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूरसह अमरावती आणि नागपूरमध्येही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी कर्नाटकातील विजयपुरातही उमेदवारी अर्ज भरला होता. एकाच वेळी चार ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आल्याची पडताळणी करण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
व्यंकटेश्वर महास्वामीजी हे कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील तीन मतदारसंघ आणि कर्नाटकमधूनही उमेदवारी अर्ज भरला आहे. एका उमेदवाराला जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची कायदेशीर मुभा आहे. पण व्यंकटेश्वर महास्वामी यांनी चार ठिकाणी उमेदवारी भरल्याने चौकशी करण्यात येत आहे.