नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होत असून त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हवामानाची स्थिती सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्याने, मतदारांना मतदानाच्या वेळी तीव्र हवामानाचा त्रास भासणार नाही. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर बारकाईने व्यवस्था करण्यात आल्या असून, उष्ण हवामान स्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीनेही सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
13 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांतील 88 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होत आहे. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे मध्यप्रदेशातील 29- बेतूल लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाचा दिवस बदलून ते तिसऱ्या टप्प्यात घेण्याचे नियोजन झाल्याची नोंद घ्यावी. मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावून जबाबदारीने आणि अभिमानाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
टप्पा दोन-: वस्तुस्थितीजन्य माहिती:
सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल 2024 रोजी 13 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांतील 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये (सामान्य- 73; अनु.जमाती- 6; अनु.जाती- 9) घेतले जाणार आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6 वाजता मतदान थांबेल. (लोकसभा मतदारसंघांनुसार मतदान संपण्याची वेळ बदलू शकते.)
बिहारच्या बांका, माधेपुरा, खगारिया आणि मुंगेर मतदारसंघांमधील अनेक मतदान केंद्रांवर उष्ण हवामान स्थितीमुळे मतदारांच्या सुविधेकरिता मतदान संपण्याची वेळ संध्याकाळी 6 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
1.67 लाख मतदान केंद्रांवर 16 लाखांपेक्षा अधिक मतदान अधिकारी 15.88 कोटींपेक्षा अधिक मतदारांसाठी सिद्ध असतील.
मतदारांमध्ये 8.08 कोटी पुरुषांचा, 7.8 कोटी महिलांचा आणि 5929 तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश आहे..
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 34.8 लाख नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्याव्यतिरिक्त, 20-29 वर्षे वयोगटातील 3.28 कोटी तरुण मतदार आहेत.
1202 उमेदवार (पुरुष – 1098; स्त्रिया -102; तृतीयपंथी व्यक्ती – 02) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वयाने 85 वर्षांपेक्षा अधिक असणाऱ्या 14.78 लाखांपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झालेली असून, 100 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 42,226 मतदार, व 14.7 लाख दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना सोयीचा गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला. गृहमतदानाच्या पर्यायी व्यवस्थेला याआधीपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत असून, तिची प्रशंसाही होत आहे.
मतदानाशी आणि सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्यासाठी 3 हेलिकॉप्टर्स, 4 विशेष रेल्वेगाड्या आणि जवळपास 80,000 वाहने तैनात करण्यात आली आहेत. निम्म्यापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार असून, सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म-निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. 1 लाखापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे.
251 निरीक्षक (89 सामान्य निरीक्षक, 53 पोलीस निरीक्षक, 109 व्यय निरीक्षक) यापूर्वीच- म्हणजे मतदानाच्या आधीच त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघांमध्ये पोहोचले आहेत.
मतदारांना दिले जाणारी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यावर कठोर आणि जलद कारवाई व्हावी या उद्देशाने- एकूण 4553 भरारी पथके, 5731 स्थिर देखरेख तुकड्या, व्हिडीओ चित्रणाच्या मदतीने नजर ठेवणाऱ्या 1462 तुकड्या, आणि ते पाहणाऱ्या 844 तुकड्या यासंदर्भात अखंड लक्ष ठेवून आहेत. मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तू यांची बेकायदेशीर वाहतूक होत नाही ना, याकडे करडी नजर ठेवण्यासाठी आंतरराज्य सीमांवरील एकूण 1237 चौक्या आणि आंतरराष्ट्रीय सीमांवरील 263 चौक्या कार्यरत आहेत. समुद्री मार्ग आणि हवाई मार्गांवरही कडक पाळत ठेवण्यात आली आहे. मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने मतदार जागृती आणि सुविधा अशा दोन्ही उपाययोजनांना आणखी बळकटी देण्यात आली आहे.
वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह प्रत्येक मतदाराला विनासायास मतदान करता यावे याची काळजी घेण्यासाठी पाणी, सावली, स्वच्छतागृहे, रॅम्प, व्हीलचेअर यांसह वीजपुरवठा- अशा किमान सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. उष्ण हवामानाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे.
लोकसभेच्या 88 मतदारसंघांमध्ये मिळून सुमारे 4195 आदर्श मतदान केंद्रे उभारली आहेत, व स्थानिकदृष्ट्या महत्त्वाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित अशा पद्धतीने त्यांची उभारणी होत आहे. 4100 पेक्षा अधिक मतदान केंद्रांची व्यवस्था पूर्णपणे स्त्रियांवर सोपवलेली असून तेथे सुरक्षा कर्मचारीही स्त्रियाच आहेत. तर 640 मतदान केंद्रांची व्यवस्था दिव्यांग व्यक्ती बघत आहेत..
पुढील लिंकला भेट देऊन मतदार त्यांच्या मतदान केंद्राची माहिती आणि मतदान दिनांक पाहू शकतात- https://electoralsearch.eci.gov.in/
मतदान केंद्रांवर मतदारांच्या ओळख पडताळणीसाठी- मतदार ओळखपत्राखेरीज 12 पर्यायी कागदपत्रांचा आधार घेण्याची मुभा आयोगाने दिली आहे. मतदाराचे नाव मतदारयादीत नोंदलेले असल्यास, यापैकी कोणतेही कागदपत्र/दस्तऐवज दाखवून मतदान करता येईल.