नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची नाशिक जिल्ह्याची अधिसूचना शुक्रवारी जाहीर होत आहे. निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत
मंगरूळे यांच्यासह अधिकारी व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी जाहीर होत असून, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी निवडणूक कार्यक्रमाची व निवडणूक सज्जतेची सविस्तर माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२४ पासून सुरुवात होईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. दिनांक ४ मे २०२४ रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ६ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होईल. तर ४ जून २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.