इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री दौ-यावर असतांना त्यांनी हा राजीनामा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
याअगोदर प्रा. नवले यांनी भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले असून त्यांचा अभिमन्यू झाला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सुरेश नवले यांनी केला आहे. भाजपला शत्रूपेक्षा मित्रांना संपवण्याची घाई झाली आहे, असे सांगत त्यानी थेट हल्लाच केला होता.
यावेळी नवले म्हणाले, की भाजपने कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी घेतला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत. हे शिवसेनेला शोभादायक नाही. शिवसैनिकाला न्याय मिळत नाही, म्हणून सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आले. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी सोडले, त्याच कारणासाठी आता शिवसैनिकांचा राग आहे. विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही हे दुर्दैव आहे .मित्र पक्षाचे उमेदवार पोसण्याची जबाबदारी शिवसेनेवर आली असल्याची टीका त्यांनी केली.
महायुतीच्या जागावाटपवार नवले म्हणाले, की परभणीची जागा रासपला दिली. नाशिकच्या जागेवर निर्णय होत नाही. रत्नागिरीची जागा भाजपला सोडली आहे. भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये शिवसेनेचा बळी घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष शिवसेना पक्ष संपववायला निघाला आहे. ‘आयबी’चा रिपोर्टच्या नावाखाली उमेदवारी नाकारली जात आहेत. सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्यांच्या वाट्याला राजकीय जोहार आला, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, की जागा बदलण्यासाच्या भारतीय जनता पक्षाच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडले. ते कमी पडत आहेत.सामूहिक दबाव आणून जागा सोडून घेतल्या जात आहेत.