इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने वचननामा जाहीर केला आहे. या वचनाम्यान उध्दव ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केले असून त्यात मतदारानां आवाहन केले आहे.
या आवाहनामध्ये म्हटले आहे, यावेळी देशाची निवडणूक भारत सरकार ऐवजी मोदीसरकार या नावाने लढविली जात आहे. त्यामुळे त्या मोदी सरकारला सुज्ञ मतदारांनी काही प्रश्न विचारायला हवेत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते त्याचे काय झाले? ऊन-वारा-पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असताना शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येत आहे? प्रत्येकाच्या खात्यात रूपये १५ लाख जमा होणार होते त्याचे काय झाले? त्याऐवजी उद्योगपतींचे रूपये सव्वादोन लाख कोटी कर्ज का माफ करण्यात आले? वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होतात, त्यानुसार १० वर्षांत ही संख्या २० कोटी होते. त्या नोकऱ्याचे काय झाले? गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतक्या कशा गगनाला भिडल्या? देशात १०० स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या त्या कुठे गेल्या? गंगा मईया स्वच्छ का झाली नाही? भ्रष्ट राजकारणी जेलमध्ये टाकण्याऐवजी स्वपक्षात का घेतले? नोटबंदी मुळे काय साध्य झाले ? महाराष्ट्राचे हक्क आणि अस्मिता पायदळी का तुडविली जात आहे? देशावर १ लाख कोटी रूपयांचा कर्जाचा बोजा का वाढविला ? अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ?
इतर पक्ष भ्रष्ट आहेत म्हणणाऱ्या भाजपाचा निवडणूक रोखे घोटाळा हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरला. अजून पीएमकेअर फंडाचा महाघोटाळा कधी बाहेर येणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात आहेत. खरंतर अशा या काळ्याकुट्ट राजवटीचा अखेर करणे हेच या निवडणुकीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तोच जनतेचा जाहीरनामा असेल. मात्र प्रथेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्राधान्याने पूर्ण करावयाची कलमे आम्ही याद्वारे सादर करीत आहोत. इंडिया आघाडीने विस्तृत असा जाहीरनामा दिलेला आहे. सत्तेतील भागीदार पक्ष म्हणून शिवसेना त्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा आग्रही राहील.
देशातील लोकशाहीवर आलेले संकट व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला निर्माण झालेला धोका वेळीच लक्षात आल्याने महाराष्ट्रातील जनता जागृत झालेलीच आहे. ही सजग व स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला मजबूत पाठिंबा देईल असा विश्वास आहे असे उद्धव बाळासाहेब यांनी म्हटले आहे.