येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघ सध्या वेगवेगळ्या कारणाने रोज चर्चेत असतो. या मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव दिल्लीतून सुचवण्यात आले. पण, त्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. पण, त्यांनी माघार का घेतली. याचे कारण सांगितले असले तरी त्यांच्यावर रोज टीका होत असते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करत असतांना मराठा समाजामुळे भुजबळांनी माघार घेतल्याचे म्हटले. यावर भुजबळांनी येवल्यात त्यांच्या विधानाला उत्तर दिले.
भुजबळ पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी कोणालाच घाबरत नाही, मराठा समाज सुद्धा माझ्या सोबत आहे. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला, त्यामुळे मी माघार घेतली. मी घाबरणारा नाही आणि घाबरून माघार घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मतदार संघात भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीने हक्क सोडलेला नाही. त्यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप कायम आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी काल प्रितम मुंडे यांचे नाव पुढे केले होते. त्यावरही भुजबळांनी नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे असे सांगत खडे बोल सुनावले.