इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरुन तिकीट वाटपावरुन तिढा असतांना बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी त्यावर पंकजा मुंडे यांना खडे बोले सुनावले. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये लक्ष द्यावे- आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही…नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीडच्या सभेत प्रितम मुंडे यांच्या नावाची नाशिकसाठी घोषणा केल्यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. त्यावर आज मंत्री भुजबळ यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
बीड येथे झालेल्या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेचं काय असा प्रश्न अनेकांना प्रश्न पडला आहे. पण, प्रीतम मुंडे यांची काळजी करुन नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन. प्रितम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही. तिचं कुठेही अडणार नाही असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर नाशिकमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यानंतर भुजबळांनी हे वक्तव्य केले.
प्रितम मुंडे यांचे नाशिकचे सासर
प्रितम मुंडे यांचे सासर हे नाशिकला असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत हे विधान केले होते. खरं तर या जागेवर अगोदरच भाजपने दावा केला आहे. त्यामुळे हे नाव नव्याने आल्यामुळे शिंदे गटासह, राष्ट्रवादीलाही धक्का बसला.