इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
विराट कोहली (नाबाद १०३) शुभमन गिल (५३) रोहित शर्मा (४८) आणि के. एल. राहुल (नाबाद ३४) ही भारतीय फलंदाजीची लाईन-अप केवळ कागदावरच मजबूत नसून मैदानावर देखील तितकीच भक्कम उभी राहिल्याने आजच्या सामन्यात भारताने ७ गडी राखून बांग्लादेशचा पराभव केला. भारतीय फलंदाजांनी बांगलादेशची गोलंदाजी पूर्णपणे निष्फळ करून टाकल्यामुळे एकही क्षण असा आला नाही, जिथे भारतीय संघ अडचणीत असल्याचे दिसून आले. विराटने थाटात भारताच विजय आणि स्वतःचे शतक साजरे केले. आता या विजयानंतर भारताचा प्रवास हा सेमी फायनलच्या दिशेने सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.
दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय फलंदाजी सुरू झाली तेव्हा कर्णधार रोहित शर्माचा ॲप्रोच हा केवळ आणि केवळ गोलंदाजांना झोडपून काढतांनाच दिसून येत होता. रोहितने याआधी ३ विश्वचषकात बांगलादेशच्या संघाविरुद्ध ३ शतके ठोकलेली आहेत. या सामन्यातही त्यादिशेनेच रोहितचा प्रवास सुरू झाला होता. परंतु त्याचा आवडता फुल शॉट थोडा खाली राहिला आणि रोहितला ४८ या धावसंख्येवर असमाधानी होवून परतावे लागले. रोहित बाद झाल्यानंतर विराटने आल्या आल्या मैदान गाजवायला सुरुवात केली. त्यातच त्याला लागोपाठ २ नोबाँलवर फ्री हिटस् मिळाल्यामुळे एकावार चौकार आणि दुसऱ्या फ्री हिटवर षटकार खेचून कोहलीने पुणेकरांना शानदार सलामी दिली.
आज पुण्यात खेळल्या गेलेल्या बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला टॉस जिंकता आला नसला तरी त्याने मॅत जिंकून दाखवली. परंतु टाँस जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय शेवटी भारताच्या पथ्यावरच पडला. अर्थात, बांग्लादेशने फलंदाजी करायला सुरुवात केली सलामीची भागीदारी ही शतकाच्या जवळपास आल्यानंतर बांग्लादेशची पहिली विकेट पडली. कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा ही भारताची फिरकी जोडी यंदाच्या विश्वचषकात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद ११० असताना जाडेजाने स्टीव्हन स्मिथला बोल्ड केले होते. तिथून ऑस्ट्रेलियन डावाच्या पडझडीला सुरुवात झाली. आज देखील बांग्लादेशची धावसंख्या १ बाद ११० असताना जडेजाने नजमूल हुसेन शांतोला पायचित केले आणि भारताला एक मोठा ब्रेक थ्रु मिळवून दिला.
बांग्लादेशची सुरुवात बघितल्यानंतर कदाचित हा संघ ३०० च्या जवळपास धावसंख्या उभारतो की काय, असे वाटू लागले होते. परंतु, भारतीय गोलंदाजांनी एक मोठी भागीदारी होऊच दिली नाही आणि त्यामुळे बांग्लादेशचा डाव २५६ धावांवर संपला. तंजीत हसन ५१ आणि लिटन दास ६६ या दोघांच्या मोठ्या डावामुळे बांग्लादेशला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी पाया रचून दिला. तळाचा फलंदाज मेहमूदुल्ला याने ३६ चेंडूत ४६ धावा करून डावाला आणखी चांगला आकार दिला.
उद्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोघांमध्ये सामना होणार आहे. गुणतालिकेत पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. अर्थात ही आकडेवारी ऑस्ट्रेलियाला शांत बसू देणार नाही त्यामुळे उद्याच्या सामन्यात रंगत असणार आहे हे निश्चित.