दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तश्रृंग गडावर चैत्र यात्रोत्सवानिमित्त नेमलेल्या बंदोबस्ताचे कर्तव्य बजावून नाशिक शहराकडे परत असतांना दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू झाला. वणी-दिंडोरी रस्त्यावर भरधाव जीपने पोलिसांच्या खासगी कारला दिलेल्या धडक दिल्याने हा अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात ज्ञानेश्वर नामदेव रौंदळ (५२) आणि रेणुका भिकाजी कदम (४६) या पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही नाशिक शहर पोलिस दलातील मोटर वाहन विभागात कार्यरत होते. वणी येथील अतिरिक्त कुमक म्हणून त्यांना पाठवण्यात आले होते. रौंदळ व कदम हे एमएच १५ डीएम ९१८३ क्रमांकाच्या कारमधून नाशिककडे येत होते. त्याचवेळी एमएच १५ ई २१३२ क्रमांकाच्या जीपने कारला धडक दिली. त्यात या दोघांचा मृत्यू झाला.
या भीषण अपघातात रौंदळ व कदम जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.