मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे.
बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे याबाबतची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. या १० बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेली रक्कम ४७ लाख ६० हजार रुपये (रु. ४७,६०,०००/-) आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये दि.२४ एप्रिल २०२४ रोजी जमा करुन भरपाई केली आहे.
राज्यातील दर्जेदार खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण / परदेशी क्रीडा साहित्य आयात करणे / आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणे इ, करिता अर्थसहाय्य राज्य क्रीडा विकास निधीतून करण्यात येते. त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य क्रीडा विकास निधीचे बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई या शाखेत कार्यरत आहे.