नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजीवनगर येथील रमेशकुमार रामकैलास दास (रा.श्रीराज अपा.) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. दास कुटुंबिय १० ते २१ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ६४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.
दुसरी घटना खुटवडनगर भागात घडली. याबाबत राजेंद्र बाळकृष्ण दुसाने (रा.गिताई बंगला,साई मंदिराजवळ चाणक्यनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दुसाने कुटूंबिय २० ते २३ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या बैठक रूमच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. खिडकीतून घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड तसेच देवघरातील चांदीच्या मुती आणि टाक असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.