नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिजामाई हाउसिंग सोसायटी परिसरात गॅसची पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदताना तुटलेले पाण्याचे पाईप, ड्रेनेजसह विजेच्या तारा दुरुस्त करण्यास प्रशासनाची दिरंगाई करण्यात येत असल्याने सोसायटी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. दहा दिवस होऊननही मनपा प्रशासनाच्या वतीने काम होत नसल्याने या भोंगळ कारभाराबाबत आज सोसायटीच्या सदस्यांनी नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता तसेच सिडको विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
जिजामाई हाउसिंग सोसायटीचे सदस्य धनसिंग पवार, विनायक वाघ, भोजराज चौधरी, पुरुषोत्तम भिरूड, विकास बोरोले, राजेंद्र फड हे तक्रार करण्यासाठी विभागीय कार्यालयात गेले असताना निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देण्यात आले.
गेल्या दहा दिवसांपासून जिजामाई हाउसिंग सोसायटी परिसरात गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. या रस्त्याचे खोदकाम करत असताना येथील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन, विद्युत वाहक तारा व ड्रेनेज लाईनचे मोठ नुकसान झालं. मात्र प्रशासनाकडून गेल्या दहा दिवसांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसह पाणी पुरवठा लाईन, विद्युत तारा न जोडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विशेषतः पाईप लाईन तुटल्याने प्रचंड पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच ड्रेनेजचे पाणी सर्व परिसरात पसरत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच येथे रस्ता बंद असल्याने येथील सदस्यांना आपली वाहने देखील रस्त्यावर उभी करावी लागत आहे.
तसेच कचरा गाडी येत नसल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरला आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून त्यांनी आज विभागीय अधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने विभागीय अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण सदस्यांना देण्यात आले. त्यामुळे सोसायटी परिसरातील नागरिकांना नाशिक महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.