नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा ठिकाणच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी उघड्या घरात शिरून पावणे तीन लाखांचे दागिे चोरून नेले. याबाबत म्हसरूळ आणि उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी गणेश राजाराम पगार (रा.अमजद किराणा जवळ,आण्णाभाऊ साठेनगर,देवळाली गाव) यांनी फिर्याद दिली आहे. पगार कुटुंबिय रविवारी (दि.२८) आपल्या घरात असतांना संशयित करण गलोत व विशाल सपकाळे (रा.दोघे उपनगर) यांनी उघड्या घरात प्रवेश करून कुटुंबियाचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सदाशिव कोकाटे करीत आहेत.
दुस-या घटनेत शारदा देवराम शिंदे (रा. आदर्शनगर,एकतानगर बोरगड) यांनी तक्रार दिली आहे. शिंदे कुटुंबिय गेल्या गुरूवारी (दि.१८) आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वसावे करीत आहेत.