नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये १३५१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या २९-बैतुल (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या ८ उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी २२ एप्रिल २०२४ पर्यंतची मुदत होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी या १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ९५ लोकसभा मतदारसंघांतून (२९-बेतुलसह) एकूण २९६३ उमेदवारी अर्ज भरण्यात आले.या सर्व १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत १९ एप्रिल २०२४ रोजी संपली. दाखल झालेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर १५६३ अर्ज वैध ठरले.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील २६ लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक ६५८ उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांतून ५१९ उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक ७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये ५-विलासपूर लोकसभा मतदारसंघात ६८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.