इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुस्लिम अल्पसंख्याकांच्या विरोधात व्देषमूलक भाषणे केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उशिरा आणि उच्च न्यायालयाने दट्ट्या लावल्यानंतर ही कारवाई करावी लागली हे राज्य पोलीस दलास अजिबात अभिमानास्पद नाही. सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन नव्हे, तर संविधानाचा आदर आणि कायद्याचे पालन करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकरयांनी सांगितले.
ते म्हणाले की, आता तरी या बाबतीत वेळकाढूपणा आणि पक्षपात न करता पोलिसांनी निर्भयपणे तपास करून गुन्हेगारांना कडक शासन होईल, अशी तजवीज केली पाहिजे. भीमा कोरेगाव प्रकरणी संन्याश्यांना फासापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी नेऊन ठेवलं आहेच. गेलेली पत परत मिळवण्याची संधी आता तरी त्यांनी सोडू नये. संविधानप्रेमी जनता डोळ्यात तेल घालून त्यांच्या तपासाकडे लक्ष ठेवत राहील, यांचे भान पोलीस खात्याला राहील अशी अपेक्षा आहे.
अलिकडेच नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील प्रचार सभेत मुस्लिमांच्या विरुद्ध हिंदू़च्या भावना केवळ मतांसाठी भडकावण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. निवडणूक आयोग आजवर अशा प्रकरणांवर प्रेमाने पांघरूण घालत आल्यानेच देशाच्या पंतप्रधानपदाचे वरचेवर अवमूल्यन करायची नरेंद्र मोदी यांना खोड लागली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी निवडणूक आयोगास आपले कर्तव्य बजावण्याची आठवण करून देणारे पत्र दिले आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय कडक कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
त्यासाठी पक्षाच्या निर्णयानुसार पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे. माकप देशभर संविधानाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे ध्यानात घेता महाराष्ट्र पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी आमचा पक्ष सतत जागरूक राहील.