योगेश कातकाडे, कर सल्लागार
जर तुम्ही नोकरदार असाल व प्राप्तिकर रिटर्न भरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मूल्यांकन वर्ष २०२४-२५ करिता प्राप्तीकर रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे याचबरोबर आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी नोकरदारांना सद्यस्थितीत असलेल्या आयकराच्या जुन्या व नवीन करप्रणाली मधील कोणती कर प्रणाली योग्य आहे याबाबत निवड करताना अनेक अडचणी येत आहे. करदात्यांना कोणती करप्रणाली चांगली असेल याबाबत योग्य निर्णय घेता येत नसल्याने कर प्रणाली निश्चित करताना गोधंळ निर्माण होत आहे. करदात्यांना याबाबत निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्ना बाबत कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी दिलेली महत्वपूर्ण माहिती.
१ एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून नोकरदार वर्गाला कर प्रणाली निवडण्यासंदर्भात डिक्लेरेशन सादर करावे लागत असते हे करत असताना जुनी करप्रणाली निवडावी की नवीन कर प्रणाली यापैकी एकच करप्रणालीची निवड करावी लागते. अशावेळी कोणती कर प्रणाली कोणासाठी चांगली आहे हे समजून घेताना नव्या आणि जुन्या करप्रणालीत काय फरक आहे हे विचारात घेतले पाहिजे. उदा. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे. तुम्ही गृह कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतलेले आहेत का ? तुमची गुंतवणूक किती प्रमाणात आहे या सर्व घटकांचा आधारावर कर प्रणालीचा विचार केल्यास नक्कीच तुम्हाला योग्य पर्याय निवडता येईल.
जुनी कि नवीन कोणती करप्रणाली योग्य !
- ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ५ लाख ५० हजार पर्यंत आहे अशा व्यक्तींसाठी जुनी करप्रणाली असो किवा नवीन येथे कोणताही कर लागणार नाही.
- ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार पर्यंत आहे त्यांच्यासाठी नवीन कर प्रणाली योग्य असेल येथे त्यांना कुठलाही कर लागणार नाही.
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ ते १५ लाखाच्या दरम्यान असतील त्या करदात्यांना विचारपूर्वक योग्य कारप्रणाली निश्चित करावी लागेल. सर्व फायदे, सुट, वजावट हे सर्व तपासावे लागते. हे जर जास्त प्रमाणात असतील तर जुनी करप्रणाली उपयुक्त ठरेल याउलट समजा गुंतवणूक, गृहकर्जावरील व्याज ह्या जर गोष्टी नसतीलच किंवा कमी प्रमाणात असतील तर नवीन करप्रणाली उपयुक्त ठरेल.
- प्रत्येकाच्या वैयक्तिक उत्पन्नानुसार व इतर बाबी नुसार योग्य करप्रणाली निश्चित करावी लागेल. नवीन कर प्रणाली (New Regime) व जुनी कर प्रणाली (Old Regime) याबाबत करदाते त्यांचा सोईनुसार जी फायदेशीर आहे ती स्वीकारू शकतात. परंतु हे निश्चित करताना तुमच्या कर सल्लागारांशी सल्लामसलत जरूर करा त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे आवाहन कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी केले आहे.